Who's Online

We have 18 guests and no members online

Download Newsletter

अनुवंशिकशास्त्र - संकरित बियाणे - डॉ. अर्गीकर

१. अनुवंशिकशास्त्र (जेनेटिक्स) :-
ऑस्ट्रेलियामधील जॉन ग्रेगर मेंडल या धर्मगुरूने सन १९०० मध्ये बागेतील शोभेच्या मटारीवर प्रयोग करून पुढील संकरित पिढ्या त्यांच्या विशिष्ठ गुणाकरिता काही विशिष्ट गुणोत्तर प्रमाणात जनन पावतात असे दाखवले. पुढे १९०६ मध्ये लंडन येथील एका जागतिक परिषदेत डॉ. विल्यम बेंटसन याने वनस्पतीसुधार शास्त्राच्या मूलभूत अभ्यास क्रमास जेनेटिक्स, अथवा ``अनुवंशकशास्त्र'' असे नांव दिले.

२. भारतामधील कार्य :-
या शास्त्रात अनेक देशात कामे सुरू झाली. सन १९०५ मध्ये त्यावेळच्या भारत सरकारने बंगाल मध्ये दरभंगा जिल्ह्यातील पूसा गावी एक ``कृषि अनुसंधान संशोधन संस्था'' उभी केली. हीच संस्था १९३६ मध्ये नवी दिल्ली जवळ आणली गेली. आता या संस्थेने भारतामध्ये अनेक संशेाधन केंद्रे काढून राज्य सरकारानाही अशी केंद्रे काढण्यास प्रोत्साहन दिले आहे. पहिल्या महायुध्दानंतर आजतागायत भारतात ऊस, कापूस, गहू, भात, तृणधान्य, द्विदल धान्ये आणि तेल बियाणांचे अनेक सुधारित संकरित वाण निर्माण केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढले आहे. साखर, अन्नधान्ये याबाबतीत स्वयंपूर्णतेचे बरेच श्रेय या वाणाकडेच जाते.

भारतामधील बहुतेक राज्यात सुधारित अगर संकरित वाणांच्या शुध्द प्रतीच्या प्रमाणित बीजोत्पादनासाठी वेगळी बियाणे पैदास व प्रमाण खाती ( सीड प्रॉडक्शन व सर्टिफिकेशन डिपार्टमेंटस्) निर्माण केली आहेत.

३. धोक्याचा लाल कंदील :-
कोण्याही शास्त्राचा उपयोग आपण कसा करतो यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अणुशक्ती. अनुवंशिक शास्त्राद्वारे पिकांच्या सुधारित अगर संकरित वाण निर्माण करण्याकरिता जगात उपलब्ध असलेल्या विशिष्ट पिकांच्या वेगवेगळया जातीचे अगर प्रकारचे बी-बियाणे जमवून, संशोधन केंद्रावर ते पेरून, येणाऱ्या पिकांचा तुलनात्मक अभ्यास करून, त्यात सरस ठरलेल्या प्रकारांची निवड करून, त्यांचा सुधारित, संकरित वाण निर्माण करण्यास उपयोग केला जातो. परंतु परदेशातून आयात केलेले वेगवेगळया प्रकारचे बी-बियाणे निर्जतूंक न करता वापरले तर त्या पासून येणाऱ्या पिकातूून आपल्याकडे प्रचलित नसणाऱ्या नव्यारोगांचा अगर किडीचा प्रार्दुभाव होवू शकतो.

उदाहरणार्थ :- सन १९५९-६० साली ज्वारीचे बियाणे आपल्याकडे परदेशातून आयात केले गेले. या बियाणातून होल्मियोस्पोरियम, अँथ्रँवनाज, डाउनी मिल्ड्यु (मिजमाशी) असे भारतात पूर्वी नसलेले रोग व कीड यांचे आगमन झाले. असे अनेक रोग व कीड आपल्याकडे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यावर औषधे फवारल्या वाचून पिके घेणे दुरापास्त झाले आहे. अर्थात त्या पाठोपाठ औषधांचे दुष्परिणामही आलेच.

४. फायदे :-
सन १९४७ -४८ मध्ये बहुतेक राज्यात गव्हावर तांबेरा रोग मोठ्या प्रमाणावर पडला आणि नुकसान झाले. यानंतर भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने भरीव संशेाधन करून गाझा, याल्टा, गॅबो, या सारख्या जंगली गव्हातील रोग प्रतिबंधक गुण आपल्या गव्हाच्या जातीमध्ये संकर करून आणले. म्हणूनच गव्हाच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो आहोत. तसेच भात, कापूस, ज्वारी याच्या संकरित वाणामुळे वाढत्या लोकसंख्येच्या मागणीस तोंड देणे शक्य होत आहे.

स्थानिक कार ज्वारी १६० दिवसात पिकते तिचे सरासरी एकरी उत्पादन केवळ ७ क्विंटल आहे तर ज्वारीचे सी. एस्. एच्. सारखे संकरित वाण फक्त ११० ते ११५ दिवसात पिकते. सरासरी उत्पादन एकरी १५ क्विंटल आहे. आपणास संकरित वाणांच्या मोठ्या उत्पादन क्षमतेकडे पाहून चव ढव याकडे थोडे दुर्लक्ष केले पाहिजे. भाजीपाला, फळफळावळ यांच्या निर्मितीत आपण स्वावलंबी बनलो आहोत. काही धान्ये, साखर, कांदा, फळे यांची निर्यात करून राष्ट्नच्या आर्थिक परिस्थिती सुधारणेस हातभार लागत आहे.

५. स्थानिक जातीचे महत्व :-
स्थानिक जाती नैसर्गिक निवड पध्दतीने असंख्य रोग, कीड, अतिवृष्टि, वादळे इत्यादी आपत्तीना शतकानु शतके तोंड देत टिकून आहेत. त्यांचे महत्त्व यामुळे अजीबात कमी होत नाही. उलट अशा जातीची निवड अगर संकर पध्दतीने वाण सुधारण्यास बरेच महत्त्व आहे. प्रत आणि चव यामुळे त्यांची उपयुक्तता टिकून आहे. स्थानिक जातींच्या गुणांचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टिने संयुक्त राष्ट्न्संघाच्या अन्न व कृषि संघटनेने जगातील प्रत्येक पिकांच्या उपयुक्त वाणांचे संगोपन वेगवेगळया राष्ट्नच्या प्रमुख संशोधन केद्रावर केलेले आहे. गरजेनुसार त्यांच्या सुधारित अगर संकरित वाण निर्माण करण्यात उपयोग केला जातो.

६. कोणती काळजी घ्याल ? :-
अनुवंशिक शास्त्रात धोक्यापेक्षा फायदे अधिक आहेत. या शास्त्राला उपयुक्त असे पर्याय नाहीत. यात बी-बियाणे शुध्द असणे फार महत्वाचे आहे.

परंपरा - संशोधन (क्रॉस फर्टिलायझेशन ) होऊ न देणे, खळयामध्ये बियाणे काळजीपूर्वक हाताळणे अत्यंत महत्वाचे असते. शुध्द वाणाच्या बीजेपोटी उत्पादन आधिक मिळत असते. प्रमाणित खात्रीशीर बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. सीड सर्टिफिकेशनचे अधिकारी प्रत्येक बी-बियाणे पैदास केंद्रास वरचेवर भेटी देऊन पिकांची पाहणी व शुध्दीकरणाची काळजी घेत असतात.

घे गुपित जाणुन । तुका गेलासे सांगून ।। नको बजीरोगट । ठेव दृष्टी चोरवट ।। शुध्द वाणा पोटी । फळे येती गोमटी ।। नको पश्चाताप, सावध राहू ।
आपण आपला पीक साथी शेाधू ।। जरा जपून वापर, संकरित वाण । नको निंदू त्याला, पिकानं फूलेले रान ।।