Who's Online

We have 18 guests and no members online

Download Newsletter

पर्यावरण रक्षणात समाजाचा सहभाग - डॉ. रविंद्र व्होरा

पर्यावरणाचं रक्षण म्हणजे आपलंच रक्षण. आपलं रक्षण आपणच केलं पाहिजे. आपण आणि आपल्या कृतीमुळे होणारे बदल हे सुध्दा पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. आपण जसं स्वत:च रक्षण करतो, आपलं शरीर स्वच्छ ठेवतो तेवढ्याच नैसर्गिक पणे आपण पर्यावरणाचे रक्षण केलं पाहिजे. त्यासाठी आपली जीवनशैली निसर्गस्नेही असली पाहिजे. सर्वांनी ती अंगी बाणली की, सारा समाज, सारा मानव वंश आपोआपच निसर्गस्नेही होऊन आपल्या स्वत:च्या घराचं म्हणजे पृथ्वीचं, पृथ्वीवरील निसर्गाचं, जीवसृष्टीचं आणि सर्व संसाधनांचं संरक्षण करेल.

मानव सेवा हा श्रेष्ठ धर्म आहे हे सर्वांना मान्य असतं. पण मानवाचं अस्तित्त्व टिकवायचं असेल तर त्याहीपेक्षा उच्च अशी निसर्गसेवा आपण केली पाहिजे तरच पृथ्वीचा श्रेष्ठ पुत्र हे मानवाचं स्थान आपण यथार्थ ठरवू. खऱ्या अर्थाने निसर्गसेवा हीच मानवसेवा ठरते. कारण त्यातून साऱ्या मानववंशाचा त्याच्या भावी पिढ्यांचाही स्वार्थ सांभाळला जातो.

हे कर्तव्य काही एका मानवाच्या समूहाचे किंवा त्याने निर्माण केलेल्या शासनाचे नसते तर ते सर्व समाजाचे, त्यातील प्रत्येक घटकाचे असते. कारण लहान असो वा मोठी असो प्रत्येक व्यक्ती आपल्या कृतीने पर्यावरणाच्या विविध घटकांचे हवा, पाणी, जमीन इत्यादींचे प्रदूषण करीत असते आणि आपल्या गरजेपेक्षा नैसर्गिक संसाधनाचा अतिवापर किंवा अपव्यय करीत असते. त्यामुळे साहजिकच कमी जास्त प्रमाणात पर्यावरणास इजा पोहचत असते आणि असंतुलन वाढत जाते. त्यात भर पडते ती माणसाची पिल्लावळ दर वर्षी वाढल्यामुळे आणि साधन संपत्तीच्या असमान वाटपामुळे. थोडक्यात पर्यावरणाच्या ऱ्हासास आपणच प्रामुख्याने कारणीभूत आहोत. ज्याच्याकडे जास्त संपत्ती त्याची हाव मोठी त्यामुळे ऊर्जेची उधळपट्टी मोठी आणि ज्याच्याकडे दारिद्र्य त्याच्यावर जगण्यासाठी निसर्ग ओरबडून गरजा भागविण्याची पाळी येते. परिणामी पर्यावरणाचा अधिक ऱ्हास.

यावरून हे स्पष्ट हेाते की, समाजाच्या सर्व घटकांनी सातत्याने पर्यावरण संतुलन टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं ते कठीण नाही. अनेकांना काय करायचं याचीही जाण आली आहे. समस्या आहे ती कळतंय पण वळत नाही.
असंतुलन करायचं आपण आणि दोष दुसऱ्याच्या माथी मारायचा किंवा इतरांमुळेच प्रदुषण होतयं त्याचं त्यांनी निस्तरावं, किंवा शासन काय करतयं, त्यांनी नको का निराकरण करायला. ही वृती सोडून आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. तो उचलण्यासाठी प्रत्येकाने किंवा कुटुंबाने काय करायचं ते पाहूया.

पाणी, ऊर्जा, वनसंपदा अशी नैसर्गिक संसाधने की जी सर्व जीवसृष्टीची आहेत त्यांचा वापर गरजेपुरताच आणि काटकसरीने करावयाचा. नैसर्गिक स्त्रोताचे शक्य तितके संवर्धन करावयाचे, त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण करायचे.
आपल्या गरजा भागविताना भौतिक वा जैविक घटकांची जी उलथापालथ करतो किंवा निसर्गचक्रांत व्यत्यय आणतो, हे त्याचप्रमाणे शक्यतितकं कमी केलं पाहिजे.
एखाद्या परिसराचे किंवा स्त्रोताचे प्रदूषणामुळे झालेले असंतुलन दूर करण्याची निसर्गाची क्षमता मर्यादित असते. म्हणून प्रदूषण करण्याचे शक्य तितके टाळायचे, निदान कमी करायचे आणि झालेच तर त्याचे निराकरण करायचे किंवा त्यांच्या परिणामांची व्याप्ती कमी करायची.

मानवासाठी जो विकास करायचा तोही संतुलित व शाश्वत असला पाहिजे. म्हणजे विकासासाठी उपलब्ध असणारी संसाधने भावी पिढ्यांसाठी आणि इतर जीवसृष्टीसाठी शिल्लक राहिली पाहिजेत आणि त्यांचे शक्य तितके संवर्धन झाले पाहिजे.
आपण खेड्यात आहोत की शहरांत, आपण शेतकरी आहोत की कारखानदार त्याप्रमाणे कांही प्रमाणात आपल्या कर्तव्यात फरक पडेल. पण आता आपण पाहिली त्या सूत्रांच्याच आधारे समाजाला पर्यावरण रक्षणाचे कर्तव्य पार पाडावे लागेल.
समाजाच्या सर्व थरांमध्ये त्याबद्दलची जागृती मोहिमा वरचेवर घ्याव्या लागतील. पर्यावरण शास्त्राचा समावेश शिक्षणाच्या सर्व पातळीवर करावा लागेल. पर्यावरण संतुलनाबद्दल अनेक कायदे आहेत पण त्याचा अंमल करणारी यंत्रणा खूपच अपुरी आहे. ती वाढवावी लागेल आणि बळकट करावी लागेल.

ग्रामिण जनतेला आपापल्या परिसरातील पाणलोट क्षेत्राचा विकास करुन पावसाचे पाणी साठवावे लागेल आणि जिरवावे लागेल. शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेतनळी किंवा भूमिगत बंधारे, भूमी आच्छादन इत्यादी मार्गाने भूजल पुनर्भरण करावे लागेल. खरे तर गेल्या काही दशकंातील अनिष्ट पद्धती बदलून सेंद्रीय आणि संतुलित शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रासायनिक खते आणि किटकनाशके यांचा वापर कमी झाला की जमीनीचे, पाण्याचे आणि अन्न धान्यांचे, दूधाचे प्रदूषण कमी होईल. जमीनी सजीव हेातील नी लोकांना पोषक अन्न मिळेल.

यावरून हे स्पष्ट उद्योजकांनाही ऊर्जाबचतीचे तंत्र अंमलात आणावे लागेल. मालाचा आणि पाण्याचा पुनर्वापर करावा लागेल. प्रदूषण आटोक्यात ठेवण्याचा अथवा जागेवरच त्याचे निराकरण करण्याची व्यवस्था करावी लागेल. याखेरीज सर्वसाधारणतर साचातल्या काही चालीरीतीमध्ये बदल करणे किंवा नवे प्रधान पाडणे हे ही करावेे लागेल.

प्रत्येकजण कचरा निर्माण करतो मग त्यानेच नको कां विल्हेवाट लावायला? त्यासाठी कचरा तयार होईल तेथेच वर्गीकरण, शक्य तेंव्हा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण केले पाहिजे. विशेषत: सेंद्रीय कचऱ्याचे जीवाणू किंवा गांडूळाच्या सहाय्याने खत आपल्या घरी किंवा परिसरांत केले पाहिजे. निर्माल्याचे विसर्जन पाण्याऐवजी भूमीत केले पाहीजे. प्लॅस्टिकचा कचरा वर्षानुवर्षे कुजत नाही, मग प्लॅस्टिक पिशव्या, क्रॅरीबॅग आणि ग्लास वापरून कसे चालेल ?
शहरात आणि खेड्यातही आपण जर घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी गोळा केले आणि साठविले किंवा जिरविले तर पिण्याच्या आणि घरगुती वापराच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. शिवाय भूजलाच्या किंवा विंधनविहीरीच्या पुनर्भरणामुळे आपल्या भागातील पाण्याचे स्त्रोत बळकट होईल. पाणी वापरताना सुध्दा अपव्यय न करता पाण्याचा थंेब न् थेंब वाचविला पाहिजे.

वन संवर्धनात तर प्रत्येकाला सहभागी झालेच पाहिजे. वाढदिवशी, लग्न प्रसंगी, किंवा स्मृती दिनी वृक्षारोपण करुन संगोपन करावं. समारंभात किंवा भेटवस्तू म्हणून झाडाचे रोप द्यावे. घरोघरी रोपवाटीका कराव्यात. पालापाचोळा न जाळता त्याचं खत करावं.

जंगलापासून दूर राहणाऱ्यांनाही वन्यजीवांना अभय देण्यासाठी खूपसं करता येतं. प्राणीजन्यवस्तू व सौंदर्य प्रसाधने वापरू नयेत. हौसेखातर पक्षी, प्राणी किंवा मासे बंदिवासात ठेवू नयेत.

हवेचं किंवा ध्वनीचं प्रदूषण तर आपण दैनंदिन जीवनात सहज टाळू शकतो. टी.व्ही., टेप, लाऊडस्पिकर इत्यादींचा आवाज खोलीपुरताच आणि सुसह्य ठेवावा. फटाके उडवू नयेत आणि वाहनांचे हॉर्न्स अपघात टाळण्याखेरीज वापरू नयेत.
इंधनावर चालणारी वाहने चांगल्या स्थितीत ठेवली नी प्रदुषण नियंत्रण तपासणी नियंत्रित केली तर वाहनातील धुरामुळे होणारे प्रदूषण कमी होईल. डिझेलपेक्षा पेट्रोलची वाहने बरी आणि १ - २ किलोमिटरच्या कामासाठी पायी गेले किंवा सायकल वापरली तर प्रदूषणही नाही नी इंधनही वाचले.

घरोघरी नी स्वयंपाकघरात तर ऊर्जा वाचविण्याची खूप संधी आहे. सौरबंब आणि सौरचूल वापरणे ही फक्त उदाहरणे देता येतील. अशा एक ना दोन खूप लहान -सहान गोष्टी आपण करू शकतो.
एकूणच आपली जीवनशैली निसर्गस्नेही केली पाहिजे म्हणजे निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणही होईल.