Who's Online

We have 59 guests and no members online

Download Newsletter

कोणाच्या हातात असतं जगणं आणि मरणं
ना तुझ्या ना माझ्या कोणाच्याच
हातात काही नसतं
कोणाच्या हातात काही नसतं

ते सगळेच असते नियतीकडे
आपण फक्त तिचे बाहुले बापुडे
आहे तोपर्यंत सहन करायचे
एक एक दिवस मोजत राहायचे
ना तुझ्या नि माझ्या कोणाच्याच
हातात काही नसतं

आयुष्याच्या अगदी मध्यान्हीला
करकरीत तिन्ही सांजेला
रक्ताचा पाट वाहील
टाहो पोटात राहील
ट्रकच त्याच्या अंगावरून जाईल
पोटच्या पोराचा असं मरणं
आपल्या हातात नुसतंच रडणं

ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच
हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं

आई आलोच म्हणून सांगून गेला
आला परत पांढऱ्या शुभ्र चादरीत गुंडाळलेला
घर माणसांनी तुडुंब भरलेलं
प्रत्येकाच्या तोंडी होते सांत्वनाचे बोल
ओटी रिती झालेली मी अगतिक अबोल

ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच
हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं

न जेवताच त्याचं कायमचं जाणं
माझ्या जिवाला ते सतत लागणं
घशाखाली घास उतरतच नाही
कशासाठी कोणासाठी जगायचं कळतच नाही
आता नुसतंच जगणं बाकी काही उरलंच नाही

ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच
हातात काही
कोणाच्याच हातात काही नसतं

रोज दिवस उगवतो मनी काळोख दाटतो
तू माझ्या रक्तामासाचा गोळा तुझ्या कशी विसरू रे बाळा
तुझे जगातनसणं मला अजून पेलतच नाही
मन भडभडून येतं मग काही सुचतच नाही
देवाशी मी खूप भांडले ते शांत देव्हा-यात बसलेले

ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं

बरेच दिवसांनी तुझ्या खोलीत गेले
तुझे कपाट पुस्तके, कॉट डोळे भरून पाहिले
तुझ्या हसरा फोटो पाहून मन गलबलले
सगळे जिथल्या तेथे अगदी व्यवस्थित
तू मात्र आता कायमचाच अनुपस्थित

ना तुझ्या आणि माझ्या कोणाच्याच हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं
येऊन ठेपलीय दिवाळी चार दिवसांवर
म्हणाला होतास खूप दिवे लाऊ गच्चीवर
आता कसले दिवे माझाच मावळून गेलाय दिवा
मन बधीर पोटात कालव, कशी कणव नाही त्याला
काल तुझी पेटी उघडली नवे कपडे कोरेच राहिले

ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं

असे वाटते तू एकदम अचानक येशील
काहीतरी सांगण्याची तुला घाई असेल
हाताला धरून आधी बसवशील
हास्याचे फवारे खोलीभर उडवशील
गप्पा गोष्टीत रात्र उलटलेली असेल
जाग्रणाने डोळे लाल होऊन गेले
मऊ मऊ कापसाची घडी अलगद ठेवेन
तुला झोपलेले बघून मी जाईन सुखावून
मी सुखावून जाईन

माझ्याच हातात
सर्व काही असतं आपल्याच हातात
नियतीवर मात करून खंबीरपणे उभं राहायचं असतं

भिरभिरती पाखरे आभाळात
विचार येऊन जातो मनात

असेल कुठे त्यांचे घर
असतील कुठे त्यांचे पोरं

असेल कोठे सहचारिणी
का असेल ती विरहिणी

कितीतरी प्रश्न उभे रहातात
त्यांची उत्तरेच नसतात

पाखरं मात्र मजेत असतात
रोज नवं राज्य नवी विटी असते

आपल्याला मात्र काही बदलायचं नसतं
आपले राज्य तेच विटीही तीच असते

फुटली ग फुटली पालवी झाडाले
राहिले ग दिस जसे बाईले

गुलाबी कोवळी ती अंकुर बाळे
आईच्या कुशीत ती लडिवाळे

झाड बहरून गेलं पानोपानी
नववधू जशी सजलीय शालूनी

झुळूक वाऱ्याची हलकीशी
हितगुज करते पानांशी

आला आला ग उन्हाळा
झाडाला लागली ग पानगळ

पानं उडाली वा-यावरी
कुशी झाली रिती रिती

झाड तरी उभारलेले ताठ
ओलावला माझ्या डोळ्याचा काठ

नेमेची मग ऋतु येईल पालवीचा
साज चढेल झाडावरती आईपणाचा

आपला कसं कशासाठी जगायचं
त्याच्यापासूनच सर्व काही शिकायचं

आई बापाची महती मी वर्णू कशी
दोघेही आपापल्या जागी महान असशी

बाप श्वास तर आई उच्श्वास असते
बाप ध्वनी तर आई प्रतिध्वनी असते

आई पायाखालची जमीन असते
बाप उंच उंच आकाश असतो

बापाचे प्रेम पोटात असते
आईचे प्रेम ओठात असते

बाप फणसासारखा काटेरी पण आत गोड असतो
आई आतून-बाहेरून गोडच गोड असते

आई जन्म देते, बाप लहानाचं मोठं करतो

आई काळजी करणारी असते
बाप काळजी घेणारा असतो

बापाशी बोलताना अंतर राखलं जातं
आईशी बोलताना अंतर केव्हाच गळून पडतं

बाप वाट दाखविणारा असतो
आई वाटेवर सतत सोबत असते

समजून सांगणारा बाप असतो
समजून घेणारी आई असते

बापाचा धाक डोळ्यात असतो
आईचा राग शब्दांत असतो

आई शब्द तर बाप निःशब्द असतो
बाप थोडक्या शब्दात सर्व सांगून जातो

आईचे शब्द मारुतीचे शेपूटच असते
बाप व्यवहारी कर्तव्यतत्पर असतो

आई भावना आणि मायेत गुंतलेली असते
मनातलं अगदी आपलं सांगायला आईच हवी असते

संकटावर मात करायला मात्र बापच हवा असतो
बाप तळपणारा सूर्य तर आई शीतल चंद्र असते

बाप धगधगणारा बल्ब तर आई शांत तेवणारी समई असते
बाप स्थितप्रज्ञ तर आई उतावीळ असते

बाप सतत सावध तर आई कधी बेसावध असते

आईची माया डोळ्यावाटे पाझरत असते
बापाची माया डोळ्याबाहेर येत नसते

आईचे प्रेम सतत व्यक्त होत असते
बापाचे प्रेम अव्यक्त असते

आईच्या प्रेमाची कडकडून मिठी असते
बापाच्या प्रेमाची पाठीवर विश्वासाची थाप असते

बाप शरीर पोसतो, आई मन पोसत असते
खायला, प्यायला, ल्यायला वडील असतात

मायेनं चार घास भरवायला आई असते
बरं नसताना आई उशाशी असते

बाप पायथ्याशी पहाडासारखा उभा असतो
आई मनाने काम करत असते

बाप डोक्याने काम करत असतो
बाप उंच पर्वत तर आई खोल दरी असते

बाप विशाल सागर तर
आई झुळझुळता झरा असतो

बाप सतत भान ठेवून वागून असतो
आई कधी कधी बेभान असते

आई गावाला गेली तर घर खायला उठतं
बाप गावाला गेला तर घर निवांत असतं

पैशाकरता बापाची सतत वणवण असते
पैसे वाचवायची धडपड आईची असते

बापाचे डोक्यावर छप्पर असते
आई सारवलेली जमीन असते

आई जन्म देते बाप घडवत असतो

बाप डोक्यावरचे छप्पर असते
तर आई बसावयाचे आसन असते

आई-बाबा या एकाच नाकाच्या दोन बाजू
मानेवर असतं पडणाऱ्या काट्याचं जू

काट्याचं लसणं दोघांचं असतं
छाप्याचा आनंद सर्वांचा असतो

आई बापाला मखरात बसवावं
देवासारखंच त्यांना पुजावं

ह्या संसारी तू हसत जगावे
रडण्याचे मग नाव नसावे
फुलावरून तू गंध घ्यावा
नित्य नवा श्रावण बरसावा
कोवळे ऊन पडवीला असावे
ह्या संसारी तू हसत जगावे
रडण्याचे मग नाव नसावे

नवी नव्हाळी ऋतूंची
कोवळी पालवी वृक्षांची
नवेपणाला सतत घेत रहावे
ह्या संसारी तू हसत रहावे
रडण्याचे मग नाव नसावे

तारकांची आभाळी भरती
इंद्रधनुची कमान वरती
सप्तरंगातून सूर झिरपावे
ह्या संसारी तू हसत रहावे
रडण्याचे मग नाव नसावे

निज शैशवास नित्य जपावे
आनंदाला उधाण यावे
भरभरून ते पिऊन घ्यावे
ह्या संसारी तू हसत जगावे
रडण्याचे मग नाव नसावे